चंद्रपुर: कोविडमधून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य गंभीर आजार जडलेल्या १० रुग्णांची चंद्रपुरात रविवारी नोंद झाली. हे रुग्ण शहरातील विविध खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. कोविड रुग्णांवर ऑक्जिसन थेरपी करताना चुका झाल्यास चंद्रपुरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू शकतात, असा इशाराही जिल्हा आरोग्य विभागाने दिला आहे.
कोविडमधून बरे झालेल्यांपैकी १० रुग्णांमध्ये डोळे व नाकात अनिष्ठ परिणामाच्या तक्रारी कुटुंबियांनी संबंधित डॉक्टरांकडे केल्या. नाकाभोवतीच्या मोकळ्या जागेत ही बुरशी जागा धरून राहाते. नाकातून सतत स्त्राव होणे, तीव्र डोकेदुखी व एखादी बाब दोनदा दिसून येणे, अशी लक्षणे आढळली. डॉक्टरांना ही माहिती दिल्यानंतर हा म्युकरमायकोसिस आजार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी उपचारही सुरू केला. सध्या प्रकृती ठीक असल्याची माहिती एका रुग्णाच्या कुटुंबाने दिली.
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले, चंद्रपुरात म्युकरमायकोसिस झालेल्या ११ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. हे रुग्ण शासकीय नव्हे; तर शहरातील खासगी कोविड हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत होते. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. परंतु, रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास घातक आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अनावश्यक स्टेरॉईड देऊ नये. ऑक्सिजन थेरपीकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, असा सल्लाही डॉ. राठोड यांनी दिला आहे.