नागपूर : लष्करात ‘मिलिटरी पोलिस’ विभागात महिलांना जवान म्हणून संधी देण्याची घोषणा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यानंतर, चार महिन्यानंतर लष्कराने या पदावरील भरतीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू केली आहे. लष्कराने जाहिरात प्रसिद्ध करून या भरतीसाठी अर्ज मागवले असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रियाही २५ एप्रिलपासून सुरू झाली आहे. नोंदणीसाठी ८ जून ही अखेरची तारीख आहे.
आजवर सशस्त्र दलामध्ये महिलांची फक्त अधिकारी पदावर नियुक्ती केली जात असून वैद्यकीय, कायदा, सिग्नल, अभियांत्रिका या विभागांमध्ये त्यांना घेतले जात आहे. मात्र आता जवान म्हणून संधी मिळाल्याने आणखी एका करिअर क्षेत्राची कवाडे महिलांसाठी खुली झाली आहेत.
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पदभार हाती घेतल्यानंतर महिलांना मिलिटरी पोलिस विभागात जवान म्हणून नियुक्त करण्याची कल्पना सर्वप्रथम मांडली होती. त्यानंतर सीतारामन यांनी जानेवारीमध्ये ही घोषणा केली होती. या विभागामध्ये टप्प्याटप्प्याने महिलांना सामावून घेऊन त्यांचे संख्याबळ २० टक्क्यांपर्यंत नेण्याची योजना असल्याचे स्पष्ट केले होते. दरवर्षी ५२ याप्रमाणे महिला जवानांची संख्या ८०० पर्यंत नेली जाणार आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, भूदलात महिलांचे प्रमाण ३.८ टक्के, हवाई दलात १३.०९ टक्के, तर नौदलात ६ टक्के आहे.
मिलिटरी पोलिस विभागात महिला जवानांची जबाबदारी पुढीलप्रमाणे असेल-
– बलात्कार, विनयभंग, चोरी आदी गुन्ह्यांचा तपास
– लष्कराला पोलिसांकडून मदत आवश्यक असेल, अशा लष्करी मोहिमा
– युद्धसदृश स्थितीमध्ये सीमेजवळील गावांतून लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पोलिस/ प्रशासनाला मदत
– निर्वासितांच्या गर्दीचे व्यवस्थापन
– तपासणी नाके, नाकाबंदीवेळी महिलांची अंगझडती
– सोहळ्यांवेळी लष्करी शिस्तपालनाचे व्यवस्थापन
– युद्धबंद्यांच्या छावण्यांचे व्यवस्थापन
अधिक वाचा : मोदी यांचे ‘जय श्रीराम’; अयोध्या दौऱ्याची शक्यता?