गायी कापा असं कधीच म्हणणार नाही. पण गायींची रक्षा करताना हिंदुस्थान आज स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित देश बनला आहे याची लाज वाटते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना मोदी सरकारला चपराक लगावली.
गेल्या तीन वर्षात या देशात हिंदुत्वाच्या नावावर उन्माद सुरु आहे ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी कथित गोरक्षकांवर सडकून टीका केली. गोमाता वाचली पाहिजे पण मातेचं काय ? महिलांना न वाचवता तुम्ही गाईचं मांस खाल्लं का, याच्यामागे लागणार असाल, तर हे सगळं थोतांड आहे. हे हिंदुत्व नाही अशी घणाघाती टीका उद्धव यांनी केली.
राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व हा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. राष्ट्रीयत्व हे आमच हिंदुत्व आहे. मंदिरात जाऊन घंटा वाजवणारा हिंदू नकोय, शेंडी, जानव्यातल हिंदुत्व मला नकोय. तो जो विचार होता तो आज प्रभावीपणे मांडण्याची, अंमलात आणण्याची गरज आहे असे उद्धव म्हणाले.
अधिक वाचा : GST नवीन कर बदल; काय झाले स्वस्त, कश्यावर आता किती GST