मुंबई : जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे राज्यात सुमारे 11 हजारांपेक्षा अधिक गावांत टॅंकरची संख्या तीन वर्षांत सरासरी 80 ते 90 टक्क्यांपर्यंत घटली. अनेक गावांत सध्या एकही टॅंकर नसल्याचे चित्र आहे. यामुळे टॅंकरवरील खर्चात बचत होऊन या गावांमध्ये 16.82 लाख घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा झाला. 22 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली.
मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची व्याप्ती, अनिश्चित आणि खंडित पर्जन्यमानामुळे कृषी क्षेत्रात अनिश्चितता वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2014 मध्ये “जलयुक्त शिवार अभियान’चा निर्णय घेतला. तीन वर्षांत सुमारे 16 हजारांहून अधिक गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे झाली. सरकारबरोबरच लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये मोठा सहभाग आहे. लोकांनी स्वयंस्फूर्तीने मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.
ग्रामपंचायत स्तरावरील जलसंवर्धन आणि जलसंधारण कामाची तालुकानिहाय एकत्रित माहिती जमवली. त्यानंतर गावाच्या उपचार क्षेत्रानुसार कामांचा आराखडा करून कामे झाली. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांध, जुने सिमेंट नाला बांध, केटी वेअर दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्रोतातील गाळ काढून त्यांचे बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे, नाले जोड कामे हाती घेतली होती.
जलसंधारणाचे अनेक उपाय विविध सरकारी योजनांसोबत लोकसहभागातून राबविण्यावर भर दिला. जलजागृती, जलअंदाजपत्रक बनविण्यात जनसहभागामुळे अभियान लोकचळवळ बनले. ते राबविण्यापूर्वी ऑक्टोबर 2014 ते जून 2015 आणि ऑक्टोबर 2015 ते जून 2016 या काळात अनुक्रमे 2,772 आणि 6,140 टॅंकर राज्यात पाणी पुरवायचे.
तेथील टॅंकरची संख्या घटली आहे. तीन वर्षांत निवड झालेल्या गावांमध्ये 4,98,206 कामे झाल्याने, एकूण 11 हजार 685 गावे जलस्वयंपूर्ण झाल्याचा सरकारचा दावा आहे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये विविध उपचार पद्धती केल्यामुळे या गावांत 16.82 लाख घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा झाला. 22 लाख हेक्टर संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली. अभियानात 2018-19 या वर्षासाठी 6,200 गावांची निवड करण्यात आली. सध्या या ठिकाणी जलयुक्तची कामे प्रगतिपथावर आहेत.
तहानलेली गावे झाली पाणीदार
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या, ऑक्टोबरपासून टॅंकरची मागणी असणाऱ्या गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला. योजनेत पहिल्या वर्षी 2015-16 मध्ये 6,202 गावांची निवड झाली. एप्रिल 2016 मध्ये या गावांमध्ये 1379 टॅंकर पाणी पुरवीत होते. एप्रिल 2017 मध्ये याच ठिकाणची टॅंकरची संख्या 366 पर्यंत घटली, तर एप्रिल 2018 मध्ये ही संख्या 152 टँकरवर आली.
2016-17 मध्ये 5,288 गावांची निवड झाली. यातल्या 913 गावांमध्ये एप्रिल 2016 मध्ये 974, तर एप्रिल 2017 मध्ये 425 आणि चालू वर्षीच्या एप्रिलमध्ये 145 गावांमध्ये फक्त 115 टॅंकर सुरू होते.
2017-18 मध्ये निवड झालेल्या 5,031 गावांपैकी 438 गावांत एप्रिल 2016 मध्ये 430 टॅंकर, एप्रिल 2017 मध्ये 207 गावांमध्ये 186; तर एप्रिल 2018 मध्ये 244 गावांमध्ये 145 टॅंकर पाणी पुरवायचे.