नागपूर : दरवर्षी तूरीच्या आयातीसाठी दालमिलला केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे परवाने कोरोना काळात तीन महिने थांबवून ठेवल्याने बाजारात तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला. पुरवठा आणि मागणीत बरीच तफावत निर्माण झाल्याने मंगळवारी तूरडाळीचे भाव दीड महिन्यात किरकोळमध्ये ८५ ते ९० रुपयांवरून १३० ते १३५ रुपयांवर पोहोचले. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने तुरीची आयात आणि नाफेडच्या साठ्यातून ३.५ लाख टन तूर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुरीच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ९,५०० रुपयांवर स्थिरावले.
सरकारच्या चुकीमुळे तूरडाळीचे भाव आकाशाला भिडले आहेत. १५ दिवसात तूरडाळ तब्बल ३० रुपये किलोने वाढली आहे. दरदिवशी होणारी भाववाढ आणि ओरड झाल्यानंतर सरकारचे डोळे उघडले आणि बुधवारी तात्काळ दोन निर्णय घेतले. सरकार ३ लाख तुरीच्या आयातीसाठी परवाने जारी करणार आहे. परवाने जारी केल्यानंतर आयातीसाठी जवळपास दीड ते दोन महिने लागतील, तोपर्यंत डिसेंबरअखेरपर्यंत नवीन तूर बाजारात येईल. सरकारच्या निर्णयानंतर भाववाढीवर लगाम लागला, पण वाढलेले भाव कमी होण्याची काहीच शक्यता नाही. यावर्षी तुरीचे पीक चांगले आहे. तूर बाजारात आल्यानंतर डाळीचे भाव पुन्हा ८,५०० रुपयांवर खाली येऊ शकतात. पण त्याकरिता तीन महिने वाट पाहावी लागेल, असे होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी स्पष्ट केले.
तुरीची साठेबाजी होऊ नये म्हणून सरकारने व्यापाऱ्यांऐवजी दालमिल मालकांना आयातीचा परवाना देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला. यंदाच्या मोसमात सरकारने तीन महिन्यांपूर्वीच परवाने जारी केले असते तर ग्राहकांवर जास्त भावात डाळ खरेदीची वेळ आली नसती. शेतकऱ्यांना तुरीला जास्त भाव मिळावा म्हणून सरकार आयातीकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम ग्राहकांना सोसावा लागत आहे. ज्या दुकानदारांकडे तूर डाळीचा जुना माल आहे, तेसुद्धा आता बाजाराचा कल पाहून जास्त भावात तूर डाळीची विक्री करीत आहेत. त्यामुळे किरकोळ दुकानांमध्ये १३० ते १३५ रुपये किलो भावात विक्री होत असल्याचे मोटवानी यांनी स्पष्ट केले.
चन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय
दीड महिन्यात चना डाळीचे भाव क्विंटलमागे २ हजार रुपयांनी वाढून ७५ ते ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत. आता आयातील प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय उडीद आणि मूग डाळीचे भाव प्रति किलो १० ते १२ रुपयांनी वाढले आहेत. उडीद डाळ ९० ते ११० रुपये आणि मूग डाळ ९५ ते ११५ रुपये किलो भाव आहेत. सरकारने उडीद २ लाख टन आणि मूग २ लाख टन आयातीला परवानगी दिली आहे. पण यंदाच्या मोसमात दोन्ही मिळून अडीच लाख टन आयात झाली. त्याचाही परिणाम भाववाढीवर झाला आहे. पावसाळ्यात भाज्यांचे भाव वाढून डाळींना मागणी वाढते, हा दरवर्षीचा अनुभव आहे. याकडेही यंदा सरकारने कानाडोळा केल्याचे दिसून येते.
मोठे व्यापारी करताहेत साठेबाजी
मागणी आणि पुरवठ्यातील विसंगती, प्रतिकूल हवामान, उत्पादनाची कमतरता, वाहतुकीचा वाढलेला खर्च, साठवण सुविधांचा अभाव, साठेबाज आणि काळा बाजार करणाऱ्यांनी निर्माण केलेला कृत्रिम तुटवडा आदी कारणांमुळेही सर्वच डाळींच्या किमतीत वाढल्या आहेत. याकरिता व्यापारीही जबाबदार आहे. यंदा तुरीची कमतरता पाहून व्यापाऱ्यांनी डाळीची साठेबाजी केली. याही कारणामुळे डाळींच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने साठ्यावरील नियंत्रण काढल्याने व्यापाऱ्यांचे फावत आहे. आता साठ्यावर नियंत्रण आणण्याची मागणी पुढे आली आहे.