नागपूर : जिल्ह्यात बालविवाहाची प्रकरणे वाढत असल्याने बालसंरक्षण कक्षाने कोदामेंढी ग्रामपंचायतला भेट दिली. गावात अल्पवयीन मुलीचे विवाह होऊ नये, यासाठी बालसंरक्षण कक्षाच्या सांगण्यावरून विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ अन्वये मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ होईस्तोवर लग्न करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. केल्यास बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये केल्यास वरवधूकडील मंडळी, सहभागी होणारे वऱ्हाडी, मंडप डेकोरेशनवाले, कॅटर्स सर्वांविरुद्ध गुन्हा नोंदवून दोन वर्षांची शिक्षा आदी दंडाची कारवाही करण्यात येईल, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
सोमवारी कोदामेंढी येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. लग्न करणाऱ्या कुटुंबावर आर्थिक भूर्दंड बसू नये व सामाजिक दडपण येऊ नये म्हणून यासाठी नियोजित बालविवाह थांबविण्यात पथकाने गावास भेट दिली. कुटुंबाचे समुपदेशन केले. जोपर्यंत मुलीचे वय १८ वर्ष होणार नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, असे आई-वडिलांकडून पत्र लिहून घेण्यात आले.
अंगणवाडीसेविकेकडून जिल्हा विकास व बाल विकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हा संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बालविकास प्रकल्प अधिकारी माधुरी खोब्रागडे, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना हटवार, पोलिस अधिकारी माधव चाबुस्कर आदींनी हा विवाहसोहळा होण्यापूर्वीच हाणून पाडला.
अल्पवयीन पिडीत मुलीला समुपदेशन व काळजी व संरक्षण दृष्टीकोनातून बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. १९ वर्षिय नवरदेव मुलालाही यावेळी समज देण्यात आली. ग्रामसभेतून गावकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले.