नागपूर (कामठी) : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महिलेच्या अगतिकतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कामठी शहरात नुकतीच घडली. या प्रकाराची वाच्यता केल्यास पतीला जीवे मारण्याची धमकीही तिला दिली. या प्रकरणात कामठी (जुनी) पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे.
नरेश चैतराम चाैकसे (६०, रा. माेदी पडाव, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या महिलेने नरेशकडून व्याजाने पैसे घेतले हाेते. तिच्या या अगतिकतेचा फायदा घेत नरेशने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. काही दिवसांपूर्वी त्याने तिला तिची कुही तालुक्यात असलेली शेती दाखविण्याची सूचना केली, शिवाय ॲक्टिव्हा चालविणे शिकविण्याची बतावणीही केली. दाेघेही ॲक्टिव्हाने जात असताना त्याने तिचा विनयभंग केला. त्यामुळे तिने त्याला घरी साेडून देण्याची विनंती केली. त्याने तिला घरी साेडून दिले.
काही वेळाने ताे परत घरी आला आणि घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार ३ ऑक्टाेबर राेजी घडला. या प्रकाराची इतरत्र वाच्यता केल्यास पतीला जीवे माण्याची धमकीही नरेशने तिला दिली. या प्रकारामुळे ती घाबरली हाेती. यातून सावरत तिने रविवारी (दि. २५) पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि ३७६, ३५४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी नरेश चाैकसे यास अटक केली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार देवीदास कठाळे करीत आहेत.