नागपूर : ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी

नागपूर : जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या जलाशयातील पाण्याचा साठा जवळजवळ संपला असून मृतसाठा केवळ शिल्लक आहे. तोतलाडोहमध्ये ५६ दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला ३३ दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. फक्त ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून अधिकाऱ्यांनी अन्य सर्व कामे बाजूला ठेवून पाणीटंचाईशी यशस्वी सामना कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले.

नासुप्रच्या सभागृहात पाणीआरक्षणाबद्दल पालकमंत्री बावनकुळे यांनी बुधवारी बैठक घेतली. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व मनपाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. एक दिवसआड पाणीपुरवठ्याची स्थिती ४ महिन्यांपर्यंत राहू शकते, असा अंदाज या बैठकीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

-तर मध्य प्रदेशातून पाणी

एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी १५ दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील चौराई जलाशयात ९४ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. आवश्यकता भासल्यास दोन्ही शासनाच्या स्तरावर बैठक घेऊन त्यातील १०-१५ दशलक्ष घनमीटर पाणी नागपूरसाठी घ्यावे लागणार आहे.

जलसंकट टाळण्यासाठी…

– पाण्याचा पिण्याशिवाय अन्य कारणांसाठी वापर होऊ नये. उदाहरणार्थ बांधकाम, वाहने धुणे आदी यासाठी झोननुसार दक्षता समित्या स्थापन करण्यात येणार असून त्या पाणीवापरावर नियंत्रण ठेवतील.

– मनपाच्या पाणीपुरवठ्यापैकी ३० टक्के पाणी व्यावसायिक वापरासाठी दिले जाते. त्यातही कपात करण्यात येईल. हॉटेल, बारमालक यांच्या पाणीवापरावर बंधने येतील. याशिवाय पाण्याची अजिबात गळती होणार नाही, यासाठी मनपाने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

– महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना लागणाऱ्या पाण्यातही काही प्रमाणात कपात करण्यात येईल.

– वेकोलिच्या कोळसा खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठे आहेत. १५ दिवसांत हे पाणी वापरण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

– शहरासाठी लघुनळ योजना करा, शहरात ६६० विहिरी आहेत. पाच हजार बोअरवेल्स आहेत. या सर्व जिवंत करा.

– शहरातील दूषित विहिरी आणि बोअरवेलच्या जवळ आरओ प्लान्ट लावा. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचे पाणी शुद्ध आणि स्वच्छ पिण्यासाठ़ी उपलब्ध होईल.

– जिल्हा परिषदेने ५ हजार लोकवस्तीच्या गावात आरओ प्लान्ट लावावे.

-जोपर्यंत आवश्यक आहे, तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवा.

– महापालिका, जिल्हा परिषद, महावितरण, महानिर्मिती व एनएमआरडीएने रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करावे.

अधिक वाचा : नागपूर : गांधीबागेत चोरट्यांचा हैदोस

Comments

comments