नागपुरात सुक्या मेव्याची मागणी वाढली, भाव घटले

Date:

नागपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर सर्वोत्तम उपाय म्हणून बाजारात सुक्या मेव्याची विक्री वाढली आहे. विक्रीच्या प्रमाणात भाव कमी झाले आहेत. कॉर्पोरेट कंपन्याकडून मागणी कमी असली तरीही सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सुक्या मेव्यामध्ये बादाम, अंजीर, किसमिस, काजूला जास्त मागणी आहे. आता गरीबांसह मध्यमवर्गीय खरेदीसाठी पुढे येत आहेत. खास कुटुंबीयातील लहानांसाठी ते खरेदी करीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सप्टेंबरमध्ये भाव वाढलेले नाहीत. सर्वाधिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण समजले जाणारे बादामचे दर ठोकमध्ये प्रति किलो १५० ते २०० रुपये किलो कमी झाले आहेत. मुख्यत्वे अमेरिकन बादामाला जास्त मागणी असते. भारत आणि चीन मोठे खरेदीदार आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे चीनने अमेरिकेकडून बादामाची खरेदी थांबविली आहे. याशिवाय अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अस्थिरता असल्याने मालाची आवक बंद आहे. त्याचा परिणाम भावाच्या घसरणीवर झाला आहे. सध्या ठोकमध्ये दर्जानुसार ७०० ते ९०० रुपये भाव आहे.

विक्रेत्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये लोकांनी सुका मेव्याकडे कानाडोळा करीत केवळ जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करीत होते. याशिवाय सणांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट संचालक आणि लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. पण यंदा हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू नसून लग्नसमारंभ बंद आहेत. त्याचाही परिणाम विक्रीवर झाला आहे. सध्या अनलॉक-४ मध्ये सुका मेव्याची मागणी वाढली, पण त्या प्रमाणात जवळपास १० टक्के दर कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सध्या ठोक बाजारात काजू दर्जानुसार ८५० ते ११०० रुपये किलो, बादाम ७०० ते ९०० रुपये, आक्रोट १००० ते १३००, किसमीस १८० ते ५०० आणि अंजीरचे भाव १२०० ते १५०० रुपये आहेत. सणांच्या दिवसात गिफ्ट देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्याकडून मागणी वाढते. अनेक विक्रेते पॅकिंग करण्यासाठी माल मागवितात. पण यंदा कोरोनामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. यंदा दसरा आणि दिवाळीत स्थिती काय राहील, याचा अंदाज लावणे कठीण असल्याने अनेकांनी मालाचे ऑर्डर अजूनही दिलेले नाहीत. ऑक्टोबरमध्ये गिफ्ट पॅकिंग व्यवसाय जोरात सुरू होईल आणि सुक्या मेव्याला मागणी वाढेल, अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related