नागपुरात दिवसा जमावबंदीची अंमलबजावणी कुठेच दिसेना…

नागपुरात दिवसा जमावबंदीची अंमलबजावणी कुठेच दिसेना...

नागपूर : राज्य शासनासह महापालिका आयुक्तांनी विविध निर्बंधासह पूर्णत: टाळेबंदी लागू केली. त्या अनुषंगाने रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदीचे आदेशही निर्गमित केले. मात्र, या आदेशाचे तंतोतंत पालन होताना कुठेच दिसत नाही. अनेक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आलेले दिसून येत आहेत. एकीकडे शहरात कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे आणि दुसरीकडे नागरिक कुठलेच निर्बंध पाळत नसल्याने चिंता वाढायला लागली आहे.

३० एप्रिलपर्यंत असलेल्या टाळेबंदी अंतर्गत मॉल्स, बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच अनुषंगाने रात्री पूर्णत: संचारबंदी आणि दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास अर्थात जमावबंदी घोषित केली आहे. मात्र, या दोन्ही घोषणांकडे नागरिकांनी सारासार दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. रात्री रस्त्यावर फिरण्यास निघालेल्या लोकांची भलमार असल्याचे दिसून येते. जगनाडे चौक ते केडीके कॉलेजदरम्यान हे चित्र रात्री १२ वाजतापर्यंत दिसत आहे. शिवाय, दिवसा जमावबंदीच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. हॉस्पिटल्स, किराणा दुकाने, बाजारपेठांमध्ये टाळेबंदीच्या विरोधासाठी एकत्र आलेले व्यापारी संसर्गाची कुठलीही भीती न बाळगता एकत्र आल्याचे दिसून येते. टाळेबंदीत टी-स्नॅक सेंटर्स, रेस्टाॅरंटना पार्सल सुविधेची मुभा देण्यात आली आहे. मात्र, येथे पार्सल घेण्यासाठीच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. चहा पार्सलने नेण्याची वस्तू नसल्याने अनेक जण टी-पॉईंट्सवरच चहा घेताना दिसत आहेत. अशीच स्थिती फेरीवाल्यांची आहे. फळे, नारळ पाणी विक्रेत्यांच्या ठेल्यावरही अशीच स्थिती दिसून येत आहे. विशेष म्हणजे, याबाबत पोलीस किंवा प्रशासकीय यंत्रणाही टोकत नसल्याचे दिसून येत आहे.

 

बाजारपेठा बंद तरी रस्ते फुल्ल                                                                                                  टाळेबंदी अंतर्गत बाजारपेठा बंद आहेत. मात्र, रस्त्यावर गर्दी ओसरलेली दिसत नाही. खासगी आस्थापनांना सरकारने बंद ठेवण्याचे व पर्यायी व्यवस्था म्हणून वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचारी आपल्या नियोजित वेळेत घराबाहेर पडत आहेत. नोकरदार वर्ग रस्त्यावर उतरत असल्याने गर्दी कमी झालेली नाही. अशा या विसंगत धोरणामुळेही व्यापारी क्रोधीत झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना संक्रमण बाजारपेठातूनच पसरतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

मास्क नाहीच, कारवाईसुद्धा जुजबी                                                                                          रस्त्यावर अनेक जण विनामास्क उतरत असल्याचे दिसून येत आहे. काही तरुण विनामास्क, विना हेल्मेट ट्रिपल सीटने फिरताना दिसत आहेत. पूर्वीसारखी पोलिसांची तैनाती नसल्याने अशांचे फावते आहे. काही ठिकाणी पोलिसांकडून मास्क व हेल्मेट संदर्भातील जुजबी कारवाई होत असल्याचेही दिसून येत आहे.