नागपूर, ता. ३ : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ( पीओपी मूर्ती ) वापरण्यासंदर्भात शासनाचे काही नियम आहेत. पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होऊ नये, यासाठी असलेल्या नियमांची यंदा कडक अंमलबजावणी करण्यात येईल. मूर्तीच्या मागे लाल खूण आणि मूर्ती विक्रेत्यांनी मनपाने त्यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनाचा फलक विक्री ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. तसे न करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मनपा प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिली.
गणेशोत्सव तयारीच्या दृष्टीने नुकतीच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख पुढे म्हणाले, नागपूर महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नेहमीच पुढाकार घेत असते. यात स्वयंसेवी संस्थांचा वाटा मोठा आहे. जनजागृती आणि लोकांना त्यादृष्टीने प्रोत्साहित करण्याचे कार्य स्वयंसेवी संस्था दरवर्षी करतात. निर्माल्य संकलन, जलप्रदूषण होऊ नये म्हणून पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्था करीत असलेले प्रयत्न आणि मदत मोलाची आहे. बैठकीत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिली. पीओपी मूर्तींसंदर्भात कारवाईसाठी यंदा न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड तैनात असेल. प्रत्येक विक्रेत्यांकडे जाऊन नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याबाबत ते खातरजमा करतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील, असेही श्री. शेख म्हणाले.
आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी यंदा शहरात ठेवण्यात येणाऱ्या कृत्रिम तलाव आणि विसर्जनासंदर्भात माहिती दिली. नागरिकांना त्रास होऊ नये, यादृष्टीने तयारी सुरू आहे. शुक्रवारी तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव याही वर्षी विसर्जनासाठी पूर्णत: बंद असून या तलाव परिसरात कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहे. या सर्व तलावांवर ज्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आपली सेवा देणार आहेत, त्याबद्दलही डॉ. प्रदीप दासरवार यांनी माहिती दिली.
तत्पूर्वी विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी तयारीच्या दृष्टीने आणि विसर्जनाच्या दृष्टीने आपली मते मांडली. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी यांनी पीओपी मूर्तींच्या मुद्दयावर मत मांडले. फुटाळा येथे ग्रीन व्हिजीलचे संपूर्ण स्वयंसेवक दहाही दिवस सेवा देतात. मात्र, पीओपी मूर्तींवर नियमाप्रमाणे खूण नसल्याकारणाने अडचणीचे होते. त्यामुळे पीओपीसंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विसर्जनादरम्यान तलावांवर अनेक असामाजिक तत्त्वांचा वार असतो. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. बैठकीला ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या डॉ. दीपा जैस्वाल, अंजली मिनोहा, अरण्य पर्यावरण संस्थेचे प्रणय तिजारे, अभिजीत लोखंडे, रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनचे दिनेश नायडू, रोटरी क्लब ऑफ नागपूर मिहान टाऊनचे हरिश अडतिया, मंजुषा चकनलवार, किंग कोब्रा युथ फोर्सचे अरविंदकुमार रतुडी, संजय पंचभाई, निसर्ग विज्ञान मंडळचे डॉ. विजय घुगे, दीपक शाहू, डी.ई. रंगारी, वृक्ष संवर्धन समितीचे बाबा देशपांडे, जनजागृती आव्हान बहुउद्देशीय समितीचे प्रदीप हजारे, मिलिंद टेंभुर्णीकर, निखिलेश शेंडे, पीओपी मूर्तीविरोधी कृती समितीचे नितीन माहुलकर, चंदन प्रजापती, हरितशिल्पी बहुउद्देशीय संस्थेचे सुरेश पाठक, कनक रिसोर्सेस ॲण्ड मॅनेजमेंटचे कमलेश शर्मा, मनपा उद्यान विभागाचे नंदकिशोर शेंडे उपस्थित होते.
स्मार्ट स्क्रीन आणि सोशल मीडियावरून जनजागृती
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जैस्वाल यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भातील जनजागृती स्मार्ट सिटी स्क्रीन आणि सोशल मीडियावरून करण्याची सूचना केली. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या जनजागृतीचा परिणाम आता दिसू लागला आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असून त्याचा प्रभावी वापर झाल्यास उद्देश साध्य होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
मातीच्या मूर्तींचे स्वतंत्र मार्केट
पीओपी मूर्तींवर अंकुश आणायचा असेल तर मनपाने मातीच्या मूर्ती विक्रीसाठी झोननिहाय स्वतंत्र मार्केट तयार करण्याची सूचना रोटरी क्लबच्या प्रतिनिधींनी केली. या सूचनेचे सर्वांनीच स्वागत केले. काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी हा प्रयत्न काही वर्षांपूर्वीच केला. मात्र, परवानगीसाठी येणाऱ्या अडचणीच मोठ्या असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. फुटाळा आणि अन्य काही ठिकाणी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याची सूचना केली. कृत्रिम टँक हे पहिल्या दिवसापासूनच ठेवावे, अशीही सूचना प्रतिनिधींनी केली.
स्वयंसेवकांना ओळखपत्र
गणेशोत्सव विसर्जनादरम्यान सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना नागपूर महानगरपालिकेतर्फे ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले. मनपा अधिकारी-कर्मचारी, पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : दक्षिण नागपुरातील विकास कामांना गती द्या!