नागपूर: लॉकडाउनच्या काळात रेशन कार्ड धारकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानांमधून अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र शिधापत्रिकेवर अन्नधान्याची उचल न केलेले नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख नागरिक आहेत. त्यांना सद्याच्या परिस्थितीत अन्नधान्य देण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय नागपूर शहरात शेजारील राज्यातून व आजुबाजूच्या खेड्यांमधून उदरनिर्वाहासाठी येणा-या गोरगरीब मजुरांना व असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही अन्नधान्याचा पुरवठा होत नाही आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने तत्काळ प्रभावाने सर्व त्रुट्या दूर करून त्वरित सर्वांना अन्नधान्य पुरवठा करावा, अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासंदर्भात त्यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले.
शिष्टमंडळात आमदार अनील सोले, आमदार नागो गाणार, भारतीय जनता पार्टी नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण दटके, भाजपा नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांचा समावेश होता.
शिधापत्रिकेवर अनेक लोक अन्नधान्याची उचल करत नाही. मागील तीन महिन्यात नागपूर शहरातील सुमारे २ लाख ५० हजार तर ग्रामिण भागातील एक लाख शिधापत्रिका धारकांनी अन्नधान्याची उचल केली नाही. आज लॉकडाउनच्या परिस्थितीत या सर्वांना अन्नधान्याची गरज आहे. शहरात रोजगाराच्या शोधात येणा-या अनेकांकडे शिधापत्रिका नाही. आज सर्वत्र काम बंद असल्याने अशा लोकांच्याही दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मजूर व असंघटित क्षेत्रातील कामगारांना स्वस्त दरात किंवा शासनातर्फे देण्यात येणारे मोफत अन्नधान्य मिळावे, याबाबत जिल्हाधिका-यांनी पुढाकार घेवून अशा सर्व गोरगरीबांच्या रेशनची व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Also Read- आता ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ विशेष ॲप