नागपूर : कडेकोट पोलिस बंदोबस्तात गुरुवारी मतमोजणी शांततेत पार पडली. कळमन्यातील चिखली लेआउट येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथे मतमोजणीला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. पहाटेपासूनच संपूर्ण कळमना भागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
पारडी चौकापासून मतमोजणी केंद्राकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. प्रवेशपत्र असणाऱ्यांनाच मतमोजणी केंद्राकडे सोडण्यात येत होते. मतमोजणीदरम्यान मतमोजणी केंद्र व शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या नेतृत्वात बंदोबस्ताची चोख आखणी करण्यात आली होती.ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती. पोलिसांनी बुधवारपासून अवैध दारूविक्रेते व गुन्हेगारांची धरपकड सुरू केली. अवैध दारूविक्रेत्यांना थेट पोलिस कोठडीत डांबण्यात आले.
मतमोजणी केंद्राशिवाय शहरातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. काही ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंटही लावण्यात आले. मतदान केंद्र परिसरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी परिसरात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात आठ पोलिस निरीक्षक, दहा सहायक पोलिस निरीक्षक, १४१ वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
अधिक वाचा : पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र