नवी दिल्ली- आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया यांच्यातील विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचबरोबर देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अस्तित्वात आली आहे. या नव्या कंपनीचे नाव व्होडाफोन आयडिया लिमिटेड असे असेल. ४४.३३ कोटी ग्राहक संख्येसह या कंपनीची भागीदारी ३८.६७ टक्के असेल. कुमारमंगलम बिर्ला नवीन कंपनीमध्ये अध्यक्ष असतील.
या विलीनीकरणाच्या आधी पहिल्या क्रमांकावर असलेली भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर गेली. या कंपनीचे ३४.४५ कोटी ग्राहक असून भागीदारी ३०.५ टक्के आहे, तर २१.५२ कोटी ग्राहकांसह रिलायन्स जिओ तिसरी दूरसंचार कंपनी आहे. जिओची बाजारातील भागीदारी १८.७८ टक्के आहे. आयडिया आणि व्होडाफोन १.६ लाख कोटी रुपयांच्या या व्यवहारामुळे त्यांच्या खर्चात १४,००० कोटी रुपयांची बचत करू शकणार आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात रिलायन्स जिओशी स्पर्धा करण्यास कंपनी सक्षम झाली आहे.
या व्यवहारात व्होडाफोन इंडियाचे मूल्य ८२,८०० कोटी रुपये आणि आयडिया सेल्युलरची ७२,२०० कोटी रुपये मानले गेले आहे. नवीन कंपनीमध्ये ४५.१ टक्के भागीदारी व्होडाफोनची असेल, तर आदित्य बिर्ला समूह ज्याकडे आयडिया सेल्युलरची मालकी होती, ते नव्या कंपनीमध्ये ४.९ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी ३,९०० कोटी रुपये नगदी देणार आहे.
अधिक वाचा : गुगलचे हे काम करा आणि जिंका १,००,००० रुपये