टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी वनडे रँकिंगमधील आपले अव्वल स्थान कायम राखत कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ ९११ अंकांची कमाई केली आहे. याबरोबरच कुलदीप यादवनं सहाव्या स्थानासह गोलंदाजांच्या यादीत १० गोलंदाजांमध्ये स्थान पटकावले आहे.
कोहली चे अव्वल स्थान कायम
भारताला मंगळवारी रात्री तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-२ने पराभव पत्करावा लागला. कोहलीने मालिकेत ७५, ४५ आणि ७१ धावांची खेळी खेळत दोन अंक मिळवले. मात्र हे दोन अंक त्याला ९११ अंकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसे ठरले. याबरोबर कोहलीने ९१८ अंकांसह १९९१ पासून अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डीन जॉन्स याला मागे सारले आहे.
कुलदीप पहिल्यांदाच टॉप १० मध्ये
कुलदीपनं आपल्या कारकीर्दित पहिल्यांदाच पहिल्या १० गोलंदाजांमध्ये स्थान मिळवलं आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेला कुलदीप याने मालिकेत ९ बळी घेतले. यात त्याने ट्रँटबीजमधील पहिल्या सामन्यात २५ धावा देत ६ बळी मिळवले आहेत. पहिल्या १० गोलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा कुलदीप तिसरा भारतीय गोलंदाज आणि पाचवा फिरकी गोलंदाज ठरला आहे. भारताचा बुमराह अव्वल स्थानी असून लेग स्पीनर युजवेंद्र चहल १०व्या क्रमांकावर आहे. १० गोलंदाजांमध्ये इतर फिरकी गोलंदाज राशिद खान (दुसरा), इम्रान ताहिर (सातवा) आणि आदिल राशिद (आठवा) यांचा समावेश आहे.
इंग्लंडचा फलंदाज ज्यो रुट याने एकदिवसीय मालिकेत केलेल्या सलग दोन शतकांमुळे दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अष्टपैलू क्रमवारीतही बांगलादेशचा शकिब अल हसन अव्वल स्थान टिकवून आहे. सांघिक क्रमवारीत इंग्लंड 127 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताला एक मानांकन गुण गमवावा लागला असून, ते 121 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत.
फलंदाजांची क्रमवारी | गोलंदाजांची क्रमवारी |
---|---|
१. कोहली (भारत) – ९११ | १. बुमराह (भारत) – ७७५ |
२. जो रूट (इंग्लंड) – ८१८ | २. रशीद खान (अफगाण) – ७६३ |
३. बाबर आझम (पाक) – ८०८ | ३. हसन अली (पाक) – ७५० |
४. रोहित शर्मा (भारत) – ८०६ | ६. कुलदीप (भारत) – ६८४ |
१०. धवन (भारत) – ७७० | १०. चहल (भारत) – ६६६ |
१४. धोनी (भारत) – ७१४ | १५. अक्षर (भारत) – ६१५ |
७०. रैना (भारत) – ४९१ | ३०. भुवी (भारत) – ५६२ |
३९. पंड्या (भारत) – ५१५ | |
५३. उमेश (भारत) – ४८५ |
अधिक वाचा : नीरज चोप्रा ला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक