नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) 55 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढीबाबत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी चिंता करू नये, असा सल्ला देत मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे, असे प्रतिपादन केले.
विदर्भ व मराठवाडा व अनुसूचित क्षेत्रात उद्योगांना चालना मिळावी, म्हणून वीज दरात सवलत दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना कमी सवलत मिळणार असून नवीन उद्योगांना देखील याचा लाभ मिळत आहे. पण हे वीजदर मार्च 2019 पर्यंत निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे मार्चनंतरही उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच मुदतवाढ देण्याचे संकेत देऊन उद्योग जगताला दिलासा दिला आहे.
ते म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे येथील उत्पादन थेट जवाहरलाल नेहरू ड्रायपोर्टवर जाणार असून चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. केवळ 19 महिन्यांत भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण होणार आहे. गुजरात, कर्नाटक, दिल्लीसारख्या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने उद्योगक्षेत्रात प्रगती गाठली आहे. आज एकूण विदेशी गुंतवणुकीतील 47 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. पण अद्यापही काही मागास भागांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून संतुलित उद्योजक धोरण राबविण्याची गरज आहे.
अधिक वाचा : अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मागणी