हैदराबाद : हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. घटनास्थळी नेत असताना चौघांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. घटनास्थळी नेल्यानंतर या आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेलंगणा पोलिसांनी चौघांचं एन्काऊंटर केलं. तेलंगणा पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.
हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला महिला डॉक्टरसोबत सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर पीडित महिलेला जाळून मारण्यात आलं. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती, तसंच पीडित महिलेला लवकर न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरु लागली होती.
२७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.
डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन तिला हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर तिला जाळण्यात आलं. चारही आरोपींना २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. यानंतर आज त्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे.