नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे पती-पत्नीवर गोळीबार

गोळीबार

नागपूर: कळमेश्वर येथील शिवाजी ग्राऊंड परिसरात सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या गणेश मेश्राम (32) व प्रियंका गणेश मेश्राम (28) या पती पत्नीवर सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने गोळीबार केला. यात गणेश यांच्या पोटाला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची पत्नी प्रियंका हिला गोळी चाटून गेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीची संख्या 6 असल्याचे समजते. गोळीबारानंतर ते घटना स्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मारुती मुळूक ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मेश्राम दाम्पत्य मुळचे नागपूरच्या जयताळा येथील राहणारे असून ते दोन वर्षांपासून कळमेश्वर येथे राहत होते. गणेश हा ट्रक चालक असल्याचे समजते. जुन्या वादातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून प्रियंकाच्या बयाणानंतर वस्तुस्थिती पुढे येईल.