बिल न भरल्यामुळे कोरोना रुग्णाचे व्हेंटिलेटर काढले, रुग्णानं गमावला जीव, मनुष्यवधाच्या याचिकेवर आज सुनावणी

बिल न भरल्यामुळे कोरोना रुग्णाचे व्हेंटिलेटर काढले, रुग्णानं गमावला जीव, मनुष्यवधाच्या याचिकेवर आज सुनावणी

नागपूर : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आता काही प्रमाणात ओसरत असल्याचं समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमावावा लागला आहे. अशात आता ही लाट आटोक्यात येत असली तरीही रुग्णालयांकडून रुग्णांची लूट थांबलेली नाही. नागपुरातही हा प्रकार सर्रास पाहायला मिळत आहे. नागपुरात रुग्णलयांच्या बिलासंदर्भात पालिका आयुक्तांकडे येणाऱ्या तक्रारींची संख्या दररोज वाढतच आहे. याच प्रकरणावर आज नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे.

शासन आदेशानुसार कोविड रुग्णालयातील एकूण बेडपैकी 80 टक्के बेड हे शासकीय दरात रुग्णाला उपलब्ध करून द्यायचे आहेत तर 20 टक्के खासगी रुग्णालयांच्या दराप्रमाणे द्यायचे आहेत. मात्र नागपुरमधील बहुतांश रुग्णालयांनी हा नियम धाब्यावर बसवत रुग्णांची अक्षरशः लूट केली आहे. पाचपावली भागातील क्रिस्टल या खासगी रुग्णालयाने तर सर्वच मर्यादाच ओलांडली. या रुग्णालयात नातेवाईकांनी वेळेत बिलाचे पैसे न भरल्याने दिलीप कडेकर या कोरोना रुग्णाचे व्हेंटिलेटर काढून घेण्यात आलं आणि त्यांना आयसीयू मधून बाहेर काढत जनरल वॉर्डमध्ये हलवलं. त्यामुळे दिलीप कडेकर यांचा काही तासातच मृत्यू झाला.

या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पीडित कुटुंब नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन समोर आंदोलनाला बसलं. त्यांच्यासोबत नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. संदीप जोशी यांनी वाढीव बिलासंदर्भात नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.