कोरोनाबाधित सासूनं सुनेला मारली मिठी अन् रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच….

कोरोनाबाधित सासूनं सुनेला मारली मिठी अन् रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच....

हैदराबाद : सासू आणि सून यांच्यातील वाद हा काही नवीन विषय नाही. बहुतेक घरांमध्ये अगदी क्षुल्लक कारणांवरुन सासू-सुनेत वाद सुरू असतात. मात्र, आता या वादातून झालेला एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या घटनेत सुनेचा बदला घेण्यासाठी कोरोनाबाधित सासूनं सुनेला थेट मिठी मारली. यामागे तिचा उद्देश आपल्या सुनेलाही कोरोनाची लागण व्हावी, असा होता. यानंतर सुनेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं तिनं आपल्या सुनेला घराबाहेर काढलं.

ही विचित्र घटना तेलंगणातील एका जिल्ह्यात घडली आहे. या घटनेतील पीडितेनं तीन वर्षांपूर्वी कामारेड्डीमधील एक व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच या महिलेच्या सासूला कोरोनाची लागण झाली. यानंतर तिला होम क्वारंटाईन ठेवण्यात आलं. मात्र, आपली सून आपल्यापासून दूर राहात असल्याचं आणि फिजिकल डिस्टन्स ठेवत असल्याचं या महिलेला सहन झालं नाही. यातूनच तिनं आपल्या सुनेला आणि नातवालाही मिठी मारली. सासूची इच्छा पूर्ण झाली आणि सूनेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

सूनेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलेनं आपल्या सुनेला घराबाहेर काढलं. पीडित सुनेच्या बहिणीनं हा संपूर्ण प्रकार उघड केला. बहिणीनं पीडितेला आपल्या घरी घेऊन जात तिला होम क्वारंटाईन केलं तसंच आवश्यक ती सर्व व्यवस्था केली. महिलेचा पती या परिस्थितीमध्येही तिची मदत करू शकला नाही, कारण तो कामानिमित्त ओडिसामध्ये राहातो. पैसे कमावण्यासाठी नोकरीनिमित्त तिचा पती सात महिन्यांपासून ओडिसामध्ये आहे.