मुंबई : महाराष्ट्र सरकारनं डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर लावलेली बंदी कोर्टानं कायम ठेवली आहे. त्यामुळे तूर्तास डीजेचा आवाज बंदच राहणार आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव संपन्न झाल्यामुळे हायकोर्टानं डीजेवरील बंदी उठवावी अशी मागणी डीजे मालकांनी एका याचिकेद्वारे कोर्टाकडे केली होती. पण बंदीला अंतिम स्थगिती द्यायला कोर्टानं नकार दिलाय.
दोन आठवड्यांनी या प्रकरणाची पुन्हा सुनवाई होणार आहे. राज्यातील डीजे बंदी उठवण्यासाठी मुंबई हायकोर्टानं स्पष्ट नकार दिल्यानं सध्या तरी डीजेचा आवाज बंदच राहणार आहे. डीजे सिस्टीम सुरू करताच त्याचा किमान आवाज ध्वनिप्रदूषणाची कमाल पातळी गाठत असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे, असा दावा याचिककर्ते असलेल्या पाला या संघटनेच्या वतीनं कोर्टात करण्यात आला. त्यासाठी डीजे सिस्टिमची उपकरणं तयार करणाऱ्या परदेशी कंपन्याकडून आलेल्या अहवालाचा दाखला दिलाय. मात्र राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे आपल्या दाव्यावर ठाम असून राज्य सरकार आपल्या प्रतिज्ञापत्रात ही गोष्ट सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी कोर्टासमोर व्यक्त केलाय.
अधिक वाचा : दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ – नरेंद्र मोदी