इंदू मिलमधील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे, मात्र त्याआधीच वाद निर्माण झाला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटाने कमी करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच चौकशी केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.
आंबेडकरी समाजाची फसवणूक करण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो हाणून पाडला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. सोबतच यासंबंधी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
इंदू मिलमधील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा 350 फुटांचा असणार आहे. या स्मारकात ग्रंथालय, ई-लायब्ररी विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, नव्या आराखड्यानुसार पुतळ्याची उंची 251 फूट; तर खालचा चौथरा 99 फूट होणार आहे.
इंदू मिल येथे आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. तेथील झाडे तोडण्याची महापालिकेची परवानगी मिळविण्यात आली असून जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात येत आहे. समुद्राचे पाणी इंदू मिलमध्ये येऊ नये यासाठी भिंत उभारण्याचेही काम करण्यात येत आहे. स्मारकासाठी 743 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिलमध्ये उभारण्यात येणारा पुतळा चीनमध्ये तयार करण्यात येत आहे. पुतळ्याचे सुटे भाग मुंबईत आणून जोडले जातील, अशी माहिती पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार यांनी दिली होती.
अधिक वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण होणार