नागपूर, ता. ९ : केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्ली द्वारा संचालित क्षेत्रिय आयुर्वेदीय मातृ व शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थान आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने तिसऱ्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता कस्तुरचंद पार्क येथून ‘हेल्थ रन’ (आयुर्वेदा दौड स्वास्थ की ओर) चे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील तयारीचा आढावा मंगळवारी (ता. ९) महापौर नंदा जिचकार यांनी घेतला.
नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हील लाईन येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, भाजपच्या मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, वैद्यकीय अधिकारी (मे.) डॉ. विजय जोशी, आयोजक डॉ. आर. गोविंद रेड्डी, डॉ. सविता शर्मा, डॉ. राजेश गुरु, डॉ. मितेश रामभिया उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी ‘हेल्थ रन’ आयोजनासंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली असून ‘सार्वजनिक आरोग्यात आयुष’ (AYUSH in public health) ह्या संकल्पनेवर ही दौड राहील. सुमारे पाच हजारांवर नागरिक यामध्ये सहभागी होतील. संपूर्ण नोंदणी ऑनलाईन असून पाच किलोमीटर आणि आठ किलोमीटर दौडचे यात आयोजन असेल, असेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी नागपूर महानगरपालिकेचा अगदी जवळचा संबंध आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी नागपूर महानगरपालिका सदैव प्रयत्नरत असते. त्याबाबत जनजागृतीही करीत असते. नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारे स्वच्छता अभियान हे लोकसहभागानेच राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आयोजित ‘हेल्थ रन’मध्ये नागपूर महानगरपालिका स्वत: आयोजक म्हणून भूमिका निभावत आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांतील विद्यार्थीही सहभागी होतील. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा आयोजनाच्या यशस्वीतेकरिता कार्यरत असेल. यामध्ये शहरातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्याबाबतचा संदेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बैठकीला कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, डॉ. मिनाक्षई सिंग, डॉ. देवराव दांडेकर, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. शीतल मालखंडाले, डॉ. उमेश मोवाडे आदी उपस्थित होते.