हलबा समाजबांधवांचा सरकारला इशारा : महिलांनी थाळी वाजवून वेधले लक्ष

नागपुर :- पावसाळी अधिवेशन सुरु असतांना सोमवार ला हलबा समाजबांधवांनी संघर्ष यात्रेद्वारे पुन्हा एकदा शासनाविरोधातील आक्रोष व्यक्त केला. शेकडो महिलांनी थाळी वाजवून संवेधानिक अधिकार मिळवून देण्याची मागणी बुलंद केली. समाजाला न्याय द्या अन्यथा निवडणूक काळात प्रचारासाठी फिरकू देणार नाही, असा इशारा ही मोर्चेकऱ्यांनी शासनाला दिला आहे.
राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे गोळीबार चौकातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हातात पिवळे झेंडे हातात घेतलेले पुरुष आणि ताट – वाटी घेऊन महिला घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. भर पावसातच पिवळ्या वादळाने आगेकूच केली. शासन व राजकारण्यांच्या विरोधात घोषणा करीत मोर्चा पुढे पुढे सरकत असताना चिटणीसपार्क येथे पोलिसांनी मोर्चा रोखला. महिलांनी तिथेच ठाण मांडल्याने चौकाच्या चारही बाजूची वाहतूक खोळंबली होती. “मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. पण, अजूनही शासनादेश काढण्यात आला नाही. सरकारने हलबा जमातीचा विश्‍वासघात केला असल्याने समाजात प्रचंड असंतोष आहे. सत्ताधाऱ्यांना त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणूकीत भोगावे लागतील, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी भाषणातून दिला. ऍड. नंदा पराते, विश्‍वनाथ आसई, दे. बा. नांदकर, प्रकाश निमजे, धनंजय धापोडकर, रेखा बल्लारपुरे, किरण बारापात्रे, गीता जळगांवकर यांच्या नेतृत्वातील मोर्चात शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले होते. त्यात महिलांचा समावेश लक्षवेधी ठरला.