नागपूर – नागपूर महानगरपालिका आणि अँम्युचर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महापौर चषक’ २०१९ शरीर सौष्ठव स्पर्धेचे उदघाटन उपमहापौर मनीषा कोठे यांच्या हस्ते कच्छी विसा मैदानात झाले.
यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, परिवहन समिती सभापती तथा संयोजक नरेन्द्र (बाल्या बोरकर), लकडगंज झोन सभापती राजकुमार साहू, नगरसेविका श्रद्धा पाठक, रेखा साकोरे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडाधिकारी पियुष अंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
मागील पाच वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेद्वारे महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा विदर्भस्तरीय असून यामध्ये ७४ स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात ५० ते ६० किलो गटात २३ स्पर्धक, ६० ते ६५ किलो गटात १५, ६५ ते ७० गटात ११, ७० ते ७५ गटात ११, ७५ते ८० गटात ७, ८० किलोच्या वरील खुल्या गटात ७ स्पर्धक सहभागी झाले आहेत, अशी माहिती संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमहापौर मनीषा कोठे म्हणाल्या, नागपूर महानगरपालिका विकास कामांबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये प्रतिभावंत खेळाडूंकडे विशेष लक्ष देत असते. खेळांडूसाठी मनपाद्वारे आता विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. खेळांडूकरिता आता महापौर सहायता निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळांडूचे अभिनंदन उपमहापौर श्रीमती कोठे यांनी केले.
यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी आपल्या भाषणातून स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करत मनपाद्वारे क्रिडा क्षेत्रातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. मान्यवरांचे स्वागत जीतेंद्र गायकवाड यांनी केले. यावेळी जागतिक शरिर सौष्ठव स्पर्धा मंगोलिया आणि हॉंगकॉंग येथे पदक प्राप्त केलेल्या व क्रीडा भूषण पुरस्कार प्राप्त दिनेश चावरे यांचा सत्कार मान्यवरांद्वारे करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये राजेश तोमर, अरुण देशपांडे, संजय देशमुख, दिलीप शेगरप, अशोक खुरे, राजू महाजन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.