महाराष्ट्र शासनाची उद्या पासून मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी

Maharashtra

मुंबई : पाडव्यापासून (सोमवार) राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. गेले अनेक दिवसांपासून राज्यातील विविध संप्रदाय, धार्मिक संघटना यांनी मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी लावून धरली होती.

यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणाले की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुरवधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच. आता धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ही शिस्त पाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

भाविकांसाठी मार्गदर्शक सूचना

धार्मिक स्थळे सोमवारपासून उघडण्याची अनुमती देताना शासनाने त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. स्थळांमधील मूर्ती, पुतळे, धर्मग्रंथांना हात लावण्याची अनुमती भाविकांना नसेल. दूरुन दर्शन घ्यावे लागेल. व्यवस्थापन ठरवेल त्या वेळेनुसार ती उघडी राहतील. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळेच उघडली जातील. इथे जाताना मास्क घालणे, सॅनिटायजर/हँडवॉशचा वापर, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था अनिवार्य असेल. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन सुरक्षिततेसाठी काही नियम लागू करू शकतील.

ऑनलाइन बुकिंग सक्तीचे

शिर्डी : राज्य सरकारने येत्या पाडव्याला (सोमवार) साई मंदिर उघडण्याचा निर्णय घेऊन भाविकांना दिवाळी भेट दिली आहे. पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डीबाहेरील भाविकांनी ऑनलाईन
पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे, अशी माहिती संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी दिली.