नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने-चांदीच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. चांदीचा तुटवडा आणि खाणी बंद असल्यामुळे सोन्याचे उत्पादन ठप्प झाले आहे. त्यातुलनेत संपूर्ण जगात या दोन्ही मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांची सोने-चांदीची खरेदी वाढली आहे. भाव किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. पण वाढत्या किमतीनंतरही लोकांनी खरेदी वाढविल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना दिली.
जुलै महिन्यात २३ दिवसात १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव १,१०० रुपयांनी तर चांदीचे भाव तब्बल ११ हजारांनी वाढले आहेत. १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५१ हजारांवर पोहोचले आहेत. १९ जुलैला चांदी प्रति किलो २,५०० रुपये, २१ जुलैला ५,३०० रुपये आणि २३ जुलैला १,२०० रुपयांची वाढ होऊन ६१,३०० रुपयांवर स्थिरावली. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीवर ३ टक्के अतिरिक्त जीएसटी आकारण्यात येत आहे. भाववाढीमुळे सोने-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, भाववाढीनंतरही लोक खरेदीसाठी सराफांकडे जात आहेत. आंतररराष्ट्रीय दरानुसार देशांतर्गत दररोज भाव बदलत आहेत. दररोज होणारी भाववाढ सराफांच्या हातात नाही. भाव वाढत असतानाही दोन्ही मौल्यवान धातूंना मागणी वाढली आहे. भाववाढीवर भाष्य करणे कठीण आहे. भाववाढीमुळे सराफांची दुकानेही धोकादायक झाली आहेत.
नागपूर सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, सोने-चांदीचे दर का वाढत आहेत, यावर बोलणे कठीणच आहे. पण मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दरवाढ सुरू आहे. व्यापाऱ्यांसोबत ग्राहकांनीही खरेदी वाढविल्याने भाववाढ झाली आहे.