नागपुरात दगडाने ठेचून गुंडाची हत्या

नागपूर : दारु पिण्यासाठी सतत पैसे मागणाऱ्या व गाडी हिसकावणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांची तिघांनी दगडाने ठेचून हत्या केली. ही खळबळजनक घटना गिट्टीखदानमधील नवीन काटोल नाका परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गुंडाची हत्या केल्यानंतर तिन्ही मारेकरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर शरण आले. प्रकरण गिट्टीखदानमधील असल्याने पोलिसांनी तिघांना गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली, तर अल्पवयीन मारेकऱ्याला ताब्यात घेतले.

अंकित रामप्रसन्न तिवारी (वय २१, रा. राजीवनगर), असे मृताचे नाव आहे. सुनील ईश्वर डहरवाल (वय २१, रा. खडगाव रोड) व राहुल सीताराम डहरवाल (वय १९, रा. बालाजीनगर) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. तिघेही चुलत भाऊ आहेत. अंकित याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी भागात तो दादागिरी करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याने तिघांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी नकार दिल्याने अंकितने त्यांना मारहाण केली होती. काही दिवसांपूर्वी अंकित याने राहुल याची मोटरसायकल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी राहुल व त्याचा वाद झाला होता. अंकित हा आपल्याला ठार मारेल,अशी भीती राहुल याला होती.मंगळवारी रात्रीही त्याने राहुलला धमकी दिली. सुनील, राहुल व त्याच्या अल्पवयीन चुलत भावाने अंकितची हत्या करण्याचा कट आखला.

बुधवारी तिघेही त्याला घेऊन एमआयडीसीतील बारमध्ये गेले. तेथे त्याला दारु पाजली. त्यानंतर चौघे दोन मोटरसायकलने नवीन काटोल नाका परिसरात आले. येथे रॉडने अंकितवर वार केले. अंकित खाली पडला. त्यानंतर तिघांनी दगडाने डोके ठेचून अंकितची हत्या केली. अंकितचा खून केल्यानंतर तिघेही मोटरसायकलने एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये आले. अंकितची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. एमआयडीसी पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली.

गिट्टीखदान पोलिस एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. तिघांना ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले. पंचनामा करून अंकित याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. गुरुवारी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनील व राहुलची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

अधिक वाचा : आर्थिक आरक्षणाचा लाभ या वर्षात नाहीचः SC