रामजन्मभूमी लढ्यात संघाचा मौलिक सहभाग

भूमिपूजनप्रसंग

नागपूर : ५ आॅगस्ट रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने देशभरातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यानंतर या लढ्याला संघाने हरतºहेने पाठबळ दिले व विविध पातळ्यांवर मौलिक सहभाग दर्शविला. मंदिरासंदर्भात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत १९५९ साली अधिकृत प्रस्ताव मांडण्यात आला होता हे विशेष.

५ आॅगस्ट रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात १९५९ मध्ये सर्वात अगोदर देशातील मंदिरांवर झालेले आक्रमण यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. प्राचीन मंदिरांचे समाजात सहिष्णूता कायम ठेवत पुनर्निर्माण व्हावे, अशी भूमिका यात संघाने मांडली होती. मात्र त्यावेळी अयोध्येतील राममंदिरापेक्षा काशी विश्वनाथ मंदिरावर जास्त भर होता. त्यानंतर सुमारे दोन दशके संघातर्फे कुठलाही अधिकृत प्रस्ताव मांडण्यात आला नाही. मात्र विश्व हिंदू परिषद व इतर संघटनांच्या माध्यमातून मंदिराच्या मुद्यावर समाजात चर्चा कायम ठेवली होती. याशिवाय वेळोवेळी तत्कालीन सरसंघचालक व सरकार्यवाहांनी सार्वजनिक मंचांवरुन राम मंदिरासंदर्भातील मुद्दा जनतेसमोर मांडला होता.