नागपूर : महामेट्रोच्या नागपुरातील सात कार्यालयांमध्ये बुधवार, १५ जुलैपासून १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
नागपुरातील सर्व खासगी आणि शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थित ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी काढले आहेत. अशा आदेशाचे पत्र महामेट्रो प्रशासनाला मिळाले आहे. त्यानुसार महामेट्रोच्या एचआर विभागाने मंगळवारी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे पत्र काढले. त्यानुसार मनपा आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कार्यालयात १५ टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
मनपाच्या आदेशाचा नागपूर मेट्रो प्रकल्पातील बांधकामावर कुठलाही परिणाम होणार नाही. प्रकल्पात विविध ठिकाणी सुरू असलेले बांधकाम सुरूच राहणार आहे. लॉकडाऊनच्या काळातही मनपा आयुक्तांनी बांधकाम सुरू ठेवण्यास मनाई केली नव्हती. त्यानुसार मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या विविध नियमांचे पालन करीत बांधकाम सुरू आहे. आदेशाचा आताही बांधकामाला फटका बसणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.