माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारणार- मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यातून, व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा मिळावी यासाठी मुंबईत त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी मुंबईत श्रद्धांजली सभेत केली.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मंत्रीही उपस्थित हाेते. दिल्लीहून अटलजींच्या अस्थींचे कलश मुंबईत अाणण्यात अाले. ते महाराष्ट्रातील विविध नद्यांत विसर्जित केले जाणार अाहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे अस्थिकलश संबंधित जिल्ह्यातील पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

अटलजींनी त्यांचे जीवन देशासाठी अर्पण केले. मी वेळोवेळी त्यांच्या सल्ल्यानुसारच माझ्या कार्याची दिशा ठरवत असे. माझ्यासाठी ते प्रेरणापुरुषच होते, अशी भावना उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केली. ‘अटलजींना संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माहीत होता. त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या सभा प्रचंड गर्दी खेचत. केंद्रीय पेट्रोलियममंत्री असताना सैन्यातील शहिदांच्या परिवाराला पेट्रोल वाटपाच्या योजनेला त्यांनी तत्काळ मंजुरी दिली. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर दादरा-नगर हवेली मुक्तीच्या लढ्यात त्यांचा मोलाचा वाटा होता,’ असेही नाईक यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही अटलजींच्या कार्यावर तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘अटलजींनी राष्ट्रहिताला नेहमीच प्राधान्य दिले. राष्ट्र विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी कधीही सत्ताधारी किंवा विरोधक असा विचार केला नाही. पंतप्रधान असताना त्यांनी अाणलेल्या अनेक योजनांपैकी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना प्रभावी ठरली. रस्ते विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. रस्ते हे केवळ दळणवळणाचे साधन नसून ते शिक्षण, आरोग्याचे अनेक गावांसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करतात, असे ते नेहमी सांगत.’

हेही वाचा : सर्वाधिक रोजगार हा महाराष्ट्रात निर्माण झाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस