नागपूर : या शहरात पुन्हा लॉकडाऊन लावायचा की नाही हे पूर्णत: नागरिकांच्या हातात आहे. अजूनही वेळ गेली नाही. नियम पाळले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा प्रशासनाला लॉकडाऊन घोषित करावा लागेल. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा. नियम टाळा. लॉकडाऊन पुन्हा लादण्याची वेळ येऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली. काही बंधने टाकली. दिशानिर्देश आणि नियमांच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मुभा दिली. मात्र, ज्या दिवशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरू झाली. याचाच अर्थ नागरिक नियम पाळत नाही, असे प्रशासनाच्या लक्षात आले. याची शहानिशा करण्यासाठी महापौर संदीप जोशी हे स्वत: आजपासून (ता. १५) दररोज दहाही झोनमधील बाजार परिसरात पायी फिरणार आहेत. आज त्यांनी गांधीबाग झोनअंतर्गत येणाऱ्या महाल, इतवारी, गांधीबाग परिसरातील बाजाराचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गिरीश व्यास, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, नगरसेविका श्रध्दा पाठक, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
महाल आणि इतवारी परिसरात काही दुकानात अधिक गर्दी असल्याचे आढळून आले. काही दुकानदार स्वत:च मास्क लावलेले नव्हते. अशा ठिकाणी महापौर संदीप जोशी स्वत: गेले. त्यांना याबाबत जाब विचारला. अशा सर्व दुकानांवर उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून दंड ठोठावण्याच्या सूचना दिल्यात. विशेष म्हणजे अशा हलगर्जीपणा करणाऱ्या दुकानांवर महापौर संदीप जोशी यांच्या सूचनेनुसार ‘ऑन द स्पॉट’ दंड ठोठावण्यात आला.
काही व्यापाऱ्यांशी महापौर संदीप जोशी यांनी संवाद साधला. पुढील काही दिवसं नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. मागील दीड महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा, मास्क वापरा आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, असे आवाहन त्यांनी यावेळी व्यापाऱ्यांना केले.
नियम न पाळणाऱ्यांवर दंड
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महापौर संदीप जोशी म्हणाले, नागपुरात कोरोनाच्या परिस्थितीवर उत्तमरीत्या नियंत्रण मिळविण्यात आले होते. मात्र, थोडी सवलत दिली त्याचा नागरिकांनी आपल्या परीने अर्थ लावला. व्यापाऱ्यांना नियम पाळण्याचे बंधन घालण्यात आले होते. ते पाळल्या जाते की नाही, हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. दुर्देवाने तसे झाले नाही. म्हणून आपण स्वत: मनपा प्रशासनातील अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्या सोबत मुद्दाम बाजार परिसरात फिरून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करीत आहोत. नम्र आवाहन करूनही जर यापुढे कोणी नियम पाळले नाही तर त्यांच्यावर तातडीने दंड ठोठावण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे. यापुढे मनपाच्या सर्व झोनमधील बाजारांमध्ये तीन ते चार तास फिरून आपण जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.