नागपूर : पुरात अडकलेल्या मौदा तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन पथकाने बचाव कार्य राबवून ५८ नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. मनपाच्या सक्करदरा व लकडगंज अग्निशमन स्थानकातील पथकाद्वारे संयुक्तरीत्या हे बचाव कार्य करण्यात आले.
रविवारी मौदा येथे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याकरिता मौदा तहसील कार्यालयाद्वारे मनपाच्या अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी बोट व सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य पथकातील अग्निशमन विमोचक शिर्के, एस. घुमडे, पालवे, आर.चवरे, यंत्र चालक एस.देशमुख, यंत्र चालक जी. बावणे व एन. यडवे यांनी वळणा व कोट या दोन्ही गावातील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात ही संपूर्ण कारवाई करण्यात आली.
मनपाच्या अग्निशमन पथकाच्या या कामगिरीबद्दल महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला.
१६०० जनावरांचा मृत्यू : साडेसात हजार घरे पडली
पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले. सुदैवाने जीवहानी झाली नसली तरी आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली. पुरामुळे १६०२ जनावरांचा मृत्यू झाला, तर ७,७६५ घरे पडल्याची माहिती आहे.
पुराचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील मौदा,कामठी,पारशिवनी,कुही, सावनेर या तालुक्याला बसला आहे. सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यात झाले. पुराच्या पाण्यात तालुक्यातील १५९१ जनावरे वाहून गेली तर १४६३ घरे पडली. कामठी तालुक्यातील २ जनावरे वाहून गेली तर १७१५ घरे पडली. काटोल तालुक्यातील १ जनावर वाहून गेले आणि १२१ घरे पडली. सावनेर तालुक्यात ३ जनावरे वाहून गेली तर ३४८ घरे पडली. रामटेक तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तीन जनावरांचा मृत्यू झाला आणि २६३ घरे पडली. भिवापूर तालुक्यातील २ जनावरे वाहून गेली तर १० घरे पडली. कुही तालुक्यात ९० घरांचे नुकसान झाले. पारशिवनी तालुक्यात ३,५०० घरांचे नुकसान झाले.