नागपूर : नागपुरात १८ जुलैपासून हज यात्रेला सुरुवात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हे यात्री हजसाठी प्रस्थान करतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी मंगळवारी आज दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात हज यात्रेच्या व्यवस्थेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, छत्तीसगढ हज समितीचे अध्यक्ष सय्यद सैफुद्दीन, सेंट्रल तंजीम कमेटी, नागपूरचे अध्यक्ष हाजी अब्दुल कादीर, महाराष्ट्र राज्य हज समिती, मुंबईचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, अजीज खान, हाजी कलाम प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जमाल सिद्दिकी यांनी हज यात्रेसंदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. त्यात हज हाऊस मधील सोयी-सुविधांवर चर्चा करण्यात आली. हज यात्रेकरूंसाठी व्हिसा व पासपोर्ट वितरित करणे, हज हाऊसमध्ये अग्निशमन व्यवस्था, पाणी व इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यात आला. हज हाऊस परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, हज हाऊस स्वच्छ ठेवणे, हज यात्रेकरूंसाठी विदेशी चलनाकरीता विशेष कक्ष स्थापन करून त्याची सुरक्षा पोलीस विभागाद्वारे करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.
अतिक्रमण काढणार
हज हाऊसकडे जाणारा रस्ता अरूंद असल्याने तेथील अतिक्रमण महानगरपालिकेने काढण्याची कारवाई करावी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात करावा, आरोग्य विभागातर्फे यात्रेकरूंचे लसीकरण करावे, त्यासाठी वैद्यकीय पथक व दोन रूग्णवाहिका तैनात करण्यात याव्यात, विमानतळ परिसरात नागपूर मनपातर्फे मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी, विमानतळापर्यंत यात्रेकरूंचे साहित्य पोहोचविण्याची व्यवस्था करावी यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
अधिक वाचा : नागपूर : अॅपद्वारे काढा अनारक्षित रेल्वे तिकीट