नागपूर : शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या गोरेवाडा तलावाच्या खोलीकरण कार्याला रविवारी (ता.२३) पहिले यश मिळाले आहे. युध्दपातळीवर सुरू असलेल्या तलाव खोलीकरणामुळे पाणी लागले आहे.
शहरातील पाण्याच्या प्रश्नावर गांभीर्याने कार्य व्हावे यासाठी तीन दिवसापासून सुरू असलेल्या खोलीकरण कार्याकडे स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे विशेष लक्ष देत आहेत. सदर कामाची दररोज पाहणी करून ते आढावा घेत आहेत.
रविवारी (ता.२३) करण्यात आलेल्या पाहणी दौ-यात स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्या समवेत नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे, सर्वश्री मनोज अग्रवाल, हर्षद घाटोळे, अश्विन खवाले, किशोर रावत, सुनील गवाडे, विठ्ठल अधावे, संजय गिरहें, रेखा देने, अॅड. श्रीकांत परवटलवार आदी उपस्थित होते.
मागील शंभर वर्षांमधे पहिल्यांदाच गोरेवाडा तलाव पूर्ण आटले. शहराला पाणी पुरवठा करणा-या तलावाची ही स्थिती भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. भविष्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी तलावाचे खोलीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील तीन दिवसापासून युध्दपातळीवर तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे व या कामाचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
पदाधिका-यांसह मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी गोरेवाडा तलावाच्या खोलीकरण कार्यासाठी परिश्रम घेत आहेत. तलावाच्या खोलीकरणात लागलेले पाणी हे त्याचीच फलश्रुती आहे. तलावाचे खोलीकरण कार्याला अधिक गती मिळावी व लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावे यासाठी मनपा कटिबध्द आहे.
खोलीकरण कार्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे. लवकरात लवकर कार्य व्हावे यासाठी आणखी तीन ते चार पोकलेन वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी यावेळी दिली.
अधिक वाचा : बसपा नगरसेवक ने पानी टंकी पर किया शोले आंदोलन