नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात बनावट पावत्या बनवून खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय असून त्याचा पर्दापाश जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने केला आहे. खोट्या बिलाद्वारे १,०८३ कोटींचा व्यवहार करून १३५.४० कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे अधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आले.
बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची उपलब्धता आणि बनावट पावत्या देण्याबाबतच्या ऑनलाईन डेटा विश्लेषण साधनांद्वारे डीजीजीआय, नागपूर विभाग युनिट, औरंगाबाद प्रादेशिक युनिट आणि नाशिक प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहीम राबविली. गेल्या आठवड्यात भंडारा ते मालेगावपर्यंत महाराष्ट्रात शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या २२ करदात्यांवर विभागाने धाडी टाकल्या आणि प्रत्येक करदात्याच्या व्यवहाराची तपासणी व चौकशी केली. बºयाच ठिकाणी परिस्थिती प्रतिकूल होती. त्यामुळे अधिकाऱ्यांना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली.
तपासात असे आढळून आले की, संस्था एकतर अस्तित्वात नव्हती किंवा पत्त्यावर व्यक्तींची घरेही नव्हती. पोर्टलवर व्यावसायिक संस्थांनी पत्त्याचा पुरावा म्हणून अपलोड केलेले भाडे करार आणि वीजबिले बनावट असल्याचे आढळले. वीज बिलावर नमूद केलेले विद्युत मीटर कनेक्शन अस्तित्वात नसल्याचे विद्युत विभागाकडे केलेल्या चौकशीत आढळून आले. तसेच मनपाकडे चौकशी केली असता या संस्थांनी घोषित केलेल्या व्यवसायाचे पत्ते त्यांच्या नोंदीवर उपलब्ध नसल्याचे दिसून आले. या बनावट व्यवहारामध्ये सिल्क यार्न, वुलन यार्न, कॉटन यार्न, पेपर यार्न आणि सिंथेटिक फिलामेंट यार्न आदींचा समावेश आहे.
विभागाला मालेगाव येथे असलेल्या या रॅकेटच्या मूळ मालकाला शोधण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. त्याने खोट्या बिलाद्वारे १४.७१ कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले होते. अधिकाऱ्यांनी मालकाला नंदूरबार जिल्ह्याच्या खांडबारा या गावातून १७ तारखेला सायंकाळी ताब्यात घेतले आणि मालेगावला आणले. आरोपीला रविवार, १८ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले. न्यायाधीशांनी त्याला ३१ ऑक्टोबरपर्यंत रिमांड दिला आहे.