नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बनावट विद्यार्थी बसवणे व मूळ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका बदलवून उत्तीर्ण करवून देणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात जरीपटका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली व एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
यात मंडळाचे अधिकारी, कर्मचारी व मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी दिली.
सध्या दहावीची परीक्षा सुरू असून जरीपटका पोलिसांनी अतुल ऊर्फ गुड्ड शिवमोहन अवस्थी, चंद्रकांत ऊर्फ चंदू नीलकंठ मते आणि अमन मुकेश मोटघरे यांना अटक केली. एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीसह अनेक मोठी माणसे यात गुंतली असल्याचा संशय येत आहे. यात प्रामुख्याने किदवई शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जुबेर रा. गिट्टीखदान आणि बजेरिया परिसरातील नितीन अंगरेज याचे नाव समोर येत आहे. जुबेर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत अजून कोण जुळले आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. आरोपींकडे पोलिसांना मोबाईल व व्हॉट्सअॅप क्रमांकाच्या चिठ्ठय़ा व चार उत्तरपत्रिका सापडल्या. या उत्तरपत्रिका सोडवलेल्या असून त्या परीक्षा केंद्रांमध्ये बनावट परीक्षार्थीद्वारे बदलण्यात आल्या आहेत. मंडळातील अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : गुंडाचा दोन तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला