नागपूर : लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अनपेक्षित यश मिळालं तर काँग्रेसचा दारूण पराभव झाला. आता हा पराभव काँग्रेसच्या त्रुटींमुळे झाला आहे की ईव्हीएम घोटाळ्यामुळे झाला आहे याची शहानिशा काँग्रेस करणार आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला ३०३ तर काँग्रेसला केवळ ५२ जागा जिंकता आल्या. एकेकाळी ३०० हून अधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा इतका दारूण पराभव का झाला याचं प्रत्येक मतदानकेंद्रानुसार विश्लेषण काँग्रेस करणार आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांकडून निवडणूक आयोगाने दिलेला फॉर्म क्रमांक २० मागवण्यात आला आहे.
फॉर्म क्रमांक २०मध्ये प्रत्येक मतदानकेंद्रावर उमेदवाराला किती मतं मिळाली याची तपशीलवार माहिती दिली असते. प्रत्येक मतदानकेंद्रातील परिक्षेत्रात मतदानाआधी काँग्रेस सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेचे निकाल आणि उमेदवाराला मिळालेली एकूण मतं याची चाचपणी काँग्रेस करणार आहे.
जर दोन्ही आकड्यांमध्ये जास्त फरक नसेल, इतर काही कारणांमुळे मतं कमी मिळाली असतील तर संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष रणनीती आखणार आहे. पण जर या दोन आकड्यांमध्ये प्रचंड तफावत आढळल्यास संबंधित मतदानकेंद्रांवर ईव्हीएम घोटाळा तर झालेला नाही याची पडताळणी काँग्रेस पक्षाकडून केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकांच्या आधीपासूनच विविध राज्यांमध्ये ईव्हीएमनुसार होणाऱ्या मतमोजणीत घोटाळा होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली होती. ईव्हीएम हॅक होण्याचे, ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप निवडणूक आयोगाने वारंवार फेटाळले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या तपासणीत काय स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक वाचा : नागपूर : गोंदियात स्फोटके जप्त