मुंबई – देशातील सर्वात उत्कृष्ट अशी गुन्हे आणि गुन्हे अन्वेषण नेटवर्क आणि यंत्रणा (सी.सी.टी.एन.एस.) ही प्रणाली राज्याकडे आहे. या प्रणालीचा कायदा व सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच गुन्ह्यांची त्वरेने उकल होण्यासाठी प्रभावी वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही काळात पोलीस दलाने अतिशय उत्कृष्टपणे काम केले आहे. येत्या काळात सण, उत्सव व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने सतर्क रहावे. सी.सी.टी.एन.एस.व डिजिटायझेशनद्वारे जमा केलेल्या माहितीचा उपयोग दाखल गुन्ह्यांच्या सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात यावेत.
राज्य शासनाने गेल्या साडेतीन ते चार वर्षात पोलीस दलासाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना मालकीची घरे मिळावीत, यासाठी जिल्हा प्रमुखांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत. राज्य शासन पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
केसरकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांची शासकीय घरांच्या दुरुस्तीसाठी तसेच सी.सी.टी.व्ही. बसविण्यासाठी जिल्हा नियोजन निधीत तरतूद केली आहे. त्या तरतुदीचा उपयोग जिल्हा प्रमुखांनी करून तातडीने पोलिसांच्या नादुरुस्त घरांची दुरुस्ती करून घ्यावी. कुटुंब व्यवस्थित राहिले तर पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढून चांगल्या प्रकारे काम करू शकेल. तसेच विविध जिल्ह्यात होणारे नवनवीन प्रयोग राज्यात इतर ठिकाणी राबविण्यात यावेत.
पाटील म्हणाले की, पोलिसांच्या उत्कृष्ट कामामुळे राज्यातील नागरिक शांततेत जीवन जगत आहेत. पुढील काळात सोशल मीडियावरही पोलिसांना बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. राज्य शासनाने पोलिसांसाठी सी.सी.टी.एनएस., सायबर पोलीस ठाणी, न्याय वैद्यक प्रयोगशाळा आदी महत्त्वाचे उपक्रम सुरू केले आहेत.
अपर मुख्य सचिव पोरवाल व पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी पोलीस दलात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन पोलीस कल्याणासंबंधीचे निर्णय लवकरात लवकर घेण्यात येतील असे सांगितले.
अधिक वाचा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारणार- देवेंद्र फडणवीस