तुम्ही नियमित वीजबिल भरता ना? भरत नसाल किंवा चुकवलं असेल तर आजच भरून टाका. याचं कारण म्हणजे थकबाकीदारांना किंवा वीजबिल न भरणाऱ्यांना आता महावितरण मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. तुम्ही वीजबिल चुकवत असाल तर 3 आठवड्यात वीजपुरवठा कापला जाणार आहे. यासंदर्भात महावितरणकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्यांची संख्या देखील अधिक असल्याचं लक्षात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील 3 आठवडय़ात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी वीजबिल भरावेत आणि सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केलं आहे. आवश्यकता असल्यास हप्त्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. थकबाकीचा भरणा न करणाऱ्या इतर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा देखील नियमानुसार खंडित करण्यात येईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं आहे.
एकूणच राज्यातील आकडेवारीचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 10 महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 12 लाख 68 हजार 487 आहे. या ग्राहकांकडे 856 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 1 लाख 38 हजार 870 वाणिज्यिक ग्राहकांकडे 264 कोटी 32 लाख आणि 22 हजार 454 औद्योगिक ग्राहकांकडे 126 कोटी 35 लाखांची थकबाकी आहे.
वीजबिलाबाबत ग्राहकांच्या शंकाचं आणि तक्रारींचे निवारण करण्यात आलं. इतकंच नाही तर वारंवार सांगून देखील अद्याप अनेकांनी थकबाकीचा भरणा केला नाही. त्यामुळे अशा ग्राहकांवर चाप लावण्यासाठी आता तातडीनं कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वीजबिल चुकवणाऱ्या या वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यातच खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येईल अशी माहिती नाळे यांनी दिली आहे.