मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी आंदोलकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. कुणीही जीवावर उदार होऊ नका, असेही त्यांनी सूचित केले आहे.
डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी काकासाहेब शिंदे शहीद झाले. या दुःखद घटनेने अंतःकरण पिळवटून निघाले. व्यथित झाले. पण आपल्यालाही आता काळजी घ्यावी लागणार आहे. कारण संवादाने सुटू शकत नाही असा एकही प्रश्न असू शकत नाही.
तुम्ही भव्य मूक क्रांती मोर्चे काढून आपल्या वेदनेला वाचा फोडली. मागण्या मांडल्या आणि आंदोलन कसे असावे याचा जगाला आदर्श घालून दिला. तितक्या तिव्रतेने शासनाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेच्या दृष्टीने पावले उचलली व समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक विकासाच्या दृष्टीने आठ लाखांपर्यंत ईबीसी सवलत, मराठा बांधवांसाठी सारथी ही संस्था निर्माण करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून १० लाखांचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज सरकार भरणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
६०५ कोर्सेससाठी मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तसेच गडकिल्ले संवर्धन व इतर सर्वच मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार काम करीत आहे. मराठा आरक्षणासाठीही राज्य सरकार अनुकूल आहे. लोकशाहीत आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करुन घेण्यासाठी, म्हणणे मांडण्यासाठी आंदोलनाचा हक्क असतोच पण त्यासाठी अनमोल प्राण गमवावे लागणे हे शासन व आंदोलनकर्ते अशा दोघांसाठीही दुर्दैवी आणि दुःखद आहे, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा : मराठा आरक्षणाचा दुसरा बळी, विष घेतलेल्या जगन्नाथ सोनावणेचा मृत्यू