ना. गडकरींच्या बैठकीत उपस्थितांवर आगमनप्रसंगी जंतुनाशक फवारणी

Date:

नागपूर: कोव्हीड १९ चा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नेमलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. ७) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवनात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत येणारे ना. नितीन गडकरी यांच्यासह प्रत्येक व्यक्तींवर टनेलच्या माध्यमातून जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

नागपुरात पहिल्यांदाच कुठल्या बैठकीसाठी अशा प्रकारची जंतुनाशक फवारणी करण्यात आली. महापौर संदीप जोशी यांनी यासाठी पुढाकार घेतला. फॅबलॅब यांच्या सहकार्याने राजेन्द्र प्रसाद सायन्स एक्सप्लोरेटरी यांच्या माध्यमातून नगर भवनाच्या मुख्य द्वारावरच १६ फूट लांबीचे टनेल उभारण्यात आले होते. या टनेलमध्ये जेव्हा-जेव्हा कुणी प्रवेश करेल तेव्हा स्वयंचलित उपकरणाद्वारे जंतुनाशक फवारणी होत होती. किमान १० सेकंद ही फवारणी होते आणि व्यक्तीचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.

महापौर संदीप जोशी यांची ही संकल्पना फॅबलॅबचे संचालक प्रतीक गडकर, मिर्झा असासीम बेग, गोविंद सहस्त्रबुद्धे, यांच्यासह निखिल जुमडे, आशीष बालपांडे, यश नायक यांनी सत्यात उतरविली. सोडियम हायपोक्लोराईडचे सोल्युशन तयार करून शॉवरिंगच्या माध्यमातून ही फवारणी करण्यात येत होती.

महापौर संदीप जोशी यांनी या संपूर्ण संकल्पनेची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली. ना. गडकरी यांनी फॅबलबच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.

मेकर्स-१९ मास्कचे वाटप

फॅबलॅबच्या चमूने अभिनव पद्धतीचे मास्कसुद्धा तयार केले आहेत. एम-१९ (मेकर्स -१९) या नावाचे हे मास्क असून आतापर्यंत सुमारे तीन हजार मास्क कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत वाटप करण्यात आले आहे. अशी मास्क मोठ्या प्रमाणात तयार करून वाटप करण्याचा मनोदय फॅबलॅबच्या संचालकांनी व्यक्त केला.

Also Read- कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा!

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related