दीक्षाभूमीची दारे उघडी ठेवण्याची याचिका खारीज

याचिका

नागपूर : धम्मदीक्षा व धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता याव्ो याकरिता १४, २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीची सर्व दारे उघडी ठेवण्यात यावी अशा विनंतीसह डॉ. मिलिंद जीवने यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी खारीज केली. यासंदर्भात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला आदेश देता येणार नाही असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. स्मारक समितीने कोरोना संक्रमणामुळे दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा व धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याविषयी २५ सप्टेंबर रोजी पत्र जारी करण्यात आले आहे. त्यावर याचिकाकर्त्याचा आक्षेप होता. स्मारक समितीने कार्यक्रम आयोजित करावे हा आग्रह नाही. परंतु, समितीने संबंधित दिवशी दीक्षाभूमीची दारे बंद ठेवू नये. दोन्ही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यापासून थांबवू नये. दीक्षाभूमीची दारे नागरिकांसाठी उघडी ठेवावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.