हप्ता भरायला हवी सवलत

Date:

नागपूर: ‘करोनाच्या दहशतीमुळे गेल्या दहा दिवसांपासून प्रवासीच मिळत नाहीत. गाड्या बुक करण्याचे प्रमाण प्रचंड घसरले आहे. प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय ठप्प पडला आहे. आम्ही आमची वाहने कर्ज घेऊन विकत घेतली आहेत. आता मासिक हप्त्यांसाठी बँका तगादा लावतील. त्यामुळे पुढील दोन महिने तरी बँकांनी मासिक हप्त्यांमध्ये सवलत द्यावी’, अशी मागणी ओला-उबेरचालकांनी केली आहे.

करोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झालेले आहेत. प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. खबदरारीचा उपाय म्हणून लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे ओला, उबेर आदी प्रवासी वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नागपूर शहरातील ओलाचालक दीपक साने यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची ने-आण करणे ही आमची एकप्रकारे सेवाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसांत कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करू नये, असे आवाहन केले आहे. हाच नियम आम्हालाही लागू होतो. दहा ते बारा तास वाट पाहून प्रवासीच मिळत नाहीत. एका दिवसाच्या कमाईत घट होऊन केवळ शंभर रुपयांपर्यंत कमाई होते. एवढ्यात खाणार काय आणि बँकांचे हप्ते देणार काय? हीच परिस्थिती पुढील अनेक दिवस असेल. त्यामुळे परिस्थिती निवळेपर्यंत आणि जनजीवन सुरळीत होईपर्यंत बँकांनी मार्च-एप्रिल या दोन महिन्यांचे ईएमआय वसूल करू नयेत, त्यावर व्याजही आकारू नये तसेच कर्जफेडीच्या एकूण कालावधीत पुढे दोन महिने जोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

ओला-उबेरचालक राजू बालपांडे, विजय काटोले, आकाश मून, नीलेश गाडगे, सुदर्शन सवाईकर, सचिन पेटकर, आनंद डेहरिया, निशांत अली, रमेश गुप्ता, जोसेफ सोलोमन, किशोर मेश्राम, आकाश नागदिवे, विजय राजपूत, सागर डेकाटे, अश्विन बडगे, रवी बोरकर यांनीही अशीच मागणी केली आहे. कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याबाबत प्रवासी वाहतुकीच्या कंपन्यांनी सरकारसोबत बोलावे, अशी मागणीही चालकांनी केली.

गोंडखैरीत वाहने जमा

व्यवसाय ठप्प असल्याने बँकांचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. त्यामध्ये श्रीराम फायनान्स आणि इतर काही बँकांचा समावेश आहे. हप्ते भरणे शक्य नसल्याने चालकांनी अखेर शुक्रवारी गोंडखैरी येथे वाहने जमा केली.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related