नागपूर : उपराजधानीच्या हवामानाची व प्रदूषणाची स्थिती नागरिकांना कळावी म्हणून लावण्यात आलेले सतत वातावरणीय हवा गुणवत्ता प्रदर्शक डिजिटल फलक अल्पावधीतच कूचकामी ठरले आहेत. शहरातील प्रदूषणाची स्थिती नागरिकांनी कशी जाणून घ्यायची आणि आरोग्याची खबरदारी कशी घ्यायची, हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर आहे.
महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये ४९ डिजिटल फलक लावण्यात आले. यातील दहा फलकांमध्ये हवेची गुणवत्ता दर्शवणारी माहिती देखील प्रदर्शित करण्यात येते. याकरिता महापालिकेने एल अँड टी कंपनीसोबत पाच वर्षांचा करार केला.
मात्र, अवघ्या वर्षभरात या फलकांनी शहर स्मार्ट करण्याऐवजी स्मार्ट शहराचा आलेख मात्र खाली आणण्यास सुरुवात केली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता आणि कल याची माहिती व्हावी, आरोग्याला बाधा पोहोचण्यापूर्वीच प्रदूषणाची माहिती कळावी, उद्योग आणि नगर रचनेत मदत मिळावी, हा हे फलक लावण्यामागील उद्देश होता. मात्र, त्यातही खाली जाहिराती आणि वर हवेची गुणवत्ता दर्शवणारे घटक त्यात नोंदवले जात होते.
आता तर योग्य देखरेखी अभावी अनेक फलकांची दैना झालेली आहे. विशेष म्हणजे, ज्याठिकाणी वाहतुकीचे प्रमाण अधिक, गर्दीचे प्रमाण अधिक, प्रदूषणाची शक्यता अधिक अशा ठिकाणी ते लावले जाणे अपेक्षित होते. मात्र, मूळ उद्देशाला फाटा देण्यात आला. याउलट बिहारमधील पटना, मध्यप्रदेशातील भोपाळ यासारख्या शहरातील डिजिटल फलक उद्देश कायम राखून काम करत आहेत.
वायूची गुणवत्ता मनुष्य आणि पर्यावरणासाठी हानीकारक ठरत असल्याचे दाखवत असेल तर प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विभागावर कारवाईचे अधिकार पटना येथे प्रदूषण मंडळाला दिले आहेत. कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची माहिती फलकावर आल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यास सोपे जावे यासाठी ‘ऑनलाईन मॉनिटरिंग’ची व्यवस्था देखील भोपाळमध्ये करण्यात आली आहे. मात्र, उपराजधानीत याच्या अगदी उलट चित्र आहे.
अधिक वाचा : ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा संप : नागपुर जिल्हा दवाई विक्रेता संघ नी केले मूक निदर्शने