नागपूर: ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं. तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूरात बोलताना सांगितलं. नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात होते. त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत. याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे.
आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटकाला मदतीची गरज आहे. त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे.
राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं.
मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.
राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही.
कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, फडणवीस यांनी या आधी तीन ट्विट करून सरकारकडे पूरग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली होती. राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.
लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे.
यंदाच्या पावसाळ्यात ४३६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे, असं ते म्हणाले होते.