विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे- सुनील प्रभू

सुनील प्रभू

विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे- सुनील प्रभू

नागपूर – नाणार प्रकल्पाबाबत विधानसभेत शिवसेना आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. स्थगन प्रस्तावाद्वारे 12 गावांतील जमीनधारकांची बनावट कागदपत्रे सादर करून भूमी संपादित करणा-या अधिका-यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, प्रताप सरनाईक, वैभव नाईक, बालाजी किणीकर यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारा गावांतील मूळ मालकांचे खोटे प्रमाणपत्र तयार करून अधिका-यांच्या माध्यमातून जमिनी बळकावण्याचे काम सरकार करीत आहे. याचा शिवसेनेने निषेध केला आहे. या प्रश्नावर विधानसभेत चर्चा व्हावी ही आमची मागणी आहे. या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. हा विषयावर पटलावर यावा व त्याची नोंद केली जावी यासाठी चर्चा करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असाही इशारा प्रभू यांनी दिला.

दरम्यान, केवळ शिवसेनाच नाहीतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाणार प्रकल्प मुद्यावरुन रिंगणात उडी घेतली आहे. नाणार मुद्यावर चर्चा करण्याची आमदारांकडून मागणी केली जात आहे. यावेळी सभागृहात विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनीही वेलमध्ये उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. तर दुसरीकडे नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केले.

शिवसेना नाणारवासियांची दिशाभूल करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणताच, शिवसेनेच्या आमदारांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस आणि काही लोकांना हे बोचले, अशी टीका शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यातूनच शिवसेनेविरुद्ध जहरी भाषा बोलण्याचे त्यांनी काम केले. शेतक-यांचा संप मोडण्यात पुढाकार घेणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला शिकवू नये, असेही नीलम गो-हे यांनी यावेळी म्हटले. शिवाय, शिवसेना नाणारवासियांच्या बाजूने असताना फूट पाडण्याचे प्रयत्न करू नये, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

हे वाचा : शहरातील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना शिक़वायला शिक्षक नाहीत