अरे देवा! कापूर २००० रुपये किलो!

कापूर

नागपूर :सणासुदीत आणि कोरोनाच्या काळात कापूर ची मागणी दुप्पट झाली आहे.  कापराच्या दराने यंदा विक्रम केला असून दर आकाशाला भिडले आहेत. दर ऐकूनच भाविकांच्या अंगात कापरे भरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात कच्च्या मालाची आवक कमी असल्याने उत्पादनाची किंमत वाढली आहे. सध्या तरी भाव कमी होण्याची शक्यता नसून दिवाळीनंतर कमी होणार असल्याचे मत उत्पादकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

देशात कापूर उत्पादनासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या चार मोठ्या कंपन्या आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे कच्च्या मालाचा पुरवठा ५० टक्के चआहे. याशिवाय चीनमधून होणारी आयात थांबली आहे. त्यामुळे निर्मिती खर्च वाढला आहे. सध्या उत्पादनाच्या तुलनेत मागणी वाढली आहे. याशिवाय कोरोना काळात सोशल मीडियावर कापराच्या होणाºया प्रचारामुळे प्रत्येक जण खरेदी करीत आहे. याशिवाय गणेशोत्सवामुळे मागणी वाढली आहे. तीन महिन्यांपासून साधा किंवा कापºयाच्या वड्यांची (पॅकिंग टॅबलेट) किंमत ठोकमध्ये प्रति किलो ८०० ते ९०० रुपये होती. आता भाव १२०० ते १३०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळमध्ये १७०० ते १८०० हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. साध्या किंवा वड्याच्या कापराची पॅकिंगमध्ये विक्री होते.

भीमसेनी किंवा दगड्या कापराच्या किमतीत प्रचंड वाढ
विदर्भात दगड्या (देशी) आणि पश्चिम महाराष्ट्रात भीमसेनी नावाने प्रचलित कापराची किंमत चार महिन्यात ४०० रुपयांनी वाढली असून ठोक बाजारात प्रति किलो १३५० ते १४०० रुपये दर आहेत. किरकोळमध्ये २ हजार रुपयांत विक्री सुरू आहे. कोरोनाच्या काळात आरोग्यासाठी उत्तम आणि सर्दी व खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून या कापराला मागणी आहे. याशिवाय घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी हा कापूर जाळला जात आहे. या कापराची विक्री वाढल्याने दर वाढल्याचे उत्पादकांनी सांगितले.

व्यापारी म्हणाले, नागपुरात १३ ते १४ कापूर उत्पादक आहेत. येथून छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, खान्देश, मराठवाडा या भागात विक्रीसाठी पाठविला जातो. छत्तीसगड व मध्य प्रदेशात देवी-देवतांची आरती कापूर जाळून केली जाते. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्वाधिक विक्री होते. गणेशोत्सव आणि नवरात्रात कापराची मागणी राहणार आहे.

का वाढताहेत दर :
– मागणीच्या तुलनेत कच्च्या मालाचा कमी पुरवठा
– उत्पादन कमी, मागणी जास्त
– कोरोना काळात आयुर्वेदिक उपाय म्हणून मागणीत वाढ

कच्च्या मालाची किंमत वाढल्याने गेल्या तीन वर्षांपासून कापराचे दर वाढतच आहेत. मागणी वाढल्याने सध्या भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ग्राहकांना जास्त भाव चुकते करूनच खरेदी करावी लागत आहे. नवरात्रोत्सवात मागणी वाढणार आहे. दिवाळीनंतर भाव कमी होतील.
-नीलेश सूचक, कापूर उत्पादक़