नागपूर : स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धन महत्त्वाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी सायकलचा अधिकाधिक उपयोग हा उत्तम पर्याय ठरणार आहे. ही गरज लक्षात घेता नागपुरात सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी व शहरात तशी यंत्रणा निर्माण करण्यासाठी ‘डेडीकेटेड सायकल ट्रॅक’ उभारण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या हाऊसिंग व अर्बन डेव्हलपमेंट मंत्रालयाने पर्यावरणाच्या दृष्टीने देशातील शहरांना ‘सायकल फ्रेन्डली’ बनविण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेत नागपूरसह देशातील १०५ शहरांनी भाग घेतला आहे. डिसेंबरमध्ये या स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानुसार नागपूर स्मार्ट सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट संस्थेच्यावतीने या दिशेने पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात १८ किलोमीटरचे डेडीकेटेड सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाच्या इंचार्ज डॉ. प्रणिता वाट-उमरेडकर यांनी माहिती देताना सांगितले, प्रकल्पानुसार सायकल ट्रॅक निर्धारित झाला असून, त्याच्या डिझायनिंगचे कामही पूर्णत्वास आले आहे. या प्रकल्पात शहरातील नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा म्हणून सर्वेक्षणही करण्यात आले आहे. प्रकल्पात सायकलिस्ट, पोलीस यंत्रणा, मोबिलिटी यंत्रणा, मनपा, अभियांत्रिकी महाविद्यालय व विविध एनजीओंचा सहभाग आहे.
असे असेल ट्रॅक
लॉ कॉलेज चौक- बोले पेट्रोल पंप- अलंकार चौक-दीक्षाभूमी-नीरी एन्ड- यू-टर्न – बोले पंप चौक- महाराज बाग- आकाशवाणी चौक – व्हीसीए – जापनीज गार्डन – डब्ल्यूसीएल- टीव्ही टॉवर – वायुसेनानगर- हनुमान टेकडी- वॉकर्स स्ट्रीट- लेडीज क्लब चौकावरून परत लॉ कॉलेज चौक
अशाप्रकारची असेल व्यवस्था
हा पायलट प्रोजेक्ट आहे. विविध शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, महत्त्वाची ठिकाणे निर्धारित करूनच हा मार्ग निवडण्यात आला आहे. १८ किमीच्या ट्रॅकमध्ये १६ स्टेशन निश्चित करण्यात आले आहेत. जेणेकरून सायकल चालक ठराविक ठिकाणी जाताना संबंधित स्टेशनवर सायकल पार्क करून त्या ठिकाणी जाईल. या ट्रॅकवर मार्किंग असेल, बांबू पोलने सुरक्षित करण्यात येईल आणि सिग्नलवरही त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल. यामध्ये पायी चालणारे व अपंग व्यक्तीच्या ट्रायसिकलसाठीही व्यवस्था असेल. जेणेकरून सुसाट धावणाऱ्या वाहनांचा धोका होणार नाही.
सर्वेक्षणाचे मुद्दे
डॉ. प्रणिता उमरेडकर म्हणाल्या, अनेक लोक वर्षानुवर्षांपासून सायकलचा उपयोग करीत आहेत. अशांना सायकल चालविण्यात काय समस्या येतात? सायकल न चालविण्यामागची कारणे, महिलांच्या समस्या, पार्किंगची, रस्त्यांची समस्या, सोबत साहित्य घेऊन जाताना होणारा त्रास, हवामान आदी अनेक मुद्यांना घेऊन वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांचे मत जाणून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.