नागपूर : कोरोनाग्रस्त असलेल्या एका पोलीस शिपायासह दोघा पोलिसांचामृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले कालमेघ नगर येथील अभिजीत गिरी (३५) १५ दिवसांपासून कोरोनाने आजारी होते. पोलीस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी छातीमध्ये दुखणे वाढल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे दुपारी १२ वाजता हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते पाच वर्षांपूर्वी एका अपघातामध्ये जखमी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये संतोष कुसराम (४५, रा. पोलीस क्वॉर्टर, काटोल मार्ग) यांचा मृत्यू झाला. ते नंदनवन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे मेडिकलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोन्ही घटनांमुळे एमआयडीसी आणि नंदनवन पोलीस ठाण्यामध्ये दु:खाचे वातावरण आहे.